राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. शनिवारी सलग चौथ्या दिवशी राज्यात एक हजारांहून अधिक म्हणजे 1357 कोरोनाबाधित आढळून आले. यापूर्वी वीस फेब्रुवारीला, म्हणजे साडेतीन महिन्यांपूर्वी सुमारे चौदाशे नवीन बाधित आढळले होते. त्यानंतर क्रमाक्रमाने हा आलेख खाली आला होता. शनिवारच्या बाधितांमध्ये सर्वाधिक 889 मुंबईचे असून त्याखालोखाल 104 नवी मुंबईचे व 91 ठाण्याचे आहेत. मुंबईला लागून असलेल्या रायगडसह पालघर इत्यादी जिल्ह्यांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. रायगडात परवाच मुरुडमध्ये बाधित रुग्ण आढळल्याचे वृत्त होते. मिडियातील चर्चेतून गेला असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव होणे पूर्णपणे थांबलेले नव्हते. कृषीवलसह सर्व वृत्तपत्रांमधून अगदी कालपरवापर्यंत रोजच्या नवीन बाधितांचे आकडे येत होते. परंतु रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी असल्याने ते भीतीदायक वाटत नव्हते. आता मात्र सर्वांनीच अधिक सतर्क होण्याची गरज आहे. रेल्वे, एसटी, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, रुग्णालये, सभागृहे, हॉटेल्स, सार्वजनिक वावराच्या बंदिस्त जागा, कार्यालये इत्यादींमध्ये मुखपट्टी वापरण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्या गांभीर्याने घ्यायल्या हव्यात. मुखपट्टी ही पोलिस समोर आहेत म्हणून किंवा दंड होईल म्हणून वापरण्याची गोष्ट नाही. ताप व सर्दीची लक्षणे असणार्यांनी गाफील न राहणे आवश्यक आहे. 2020 आणि 2021 मधील पहिल्या व दुसर्या लाटेचा धसका अनेकांच्या मनात अजूनही असेल. अनेकांनी आपले आप्तस्वकीय या लाटांमध्ये डोळ्यांदेखत गमावले. काही जणांवर ऑक्सिजनअभावी उपचार होऊ शकले नाहीत. मृतदेहांवर बेवारशांप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याची पाळी आली. या अनुभवातून गेल्यामुळे बहुदा भारतामध्ये लसीकरण वेगाने झाले. अमेरिकेमध्ये लसीकरणाला विरोध करणार्यांचे आंदोलन उभे राहिले. असा खुळेपणा सुदैवाने येथे झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यामुळे का होईना, पण केंद्र सरकारने लसीकरण मोफत केले. त्याचा उपयोग आता होईल आणि लस घेतलेल्यांना तिसर्या लाटेमध्ये कमी फटका बसेल अशी आशा करायला हरकत नाही. बूस्टर म्हणजे तिसरा डोस घेण्याची मोहीम मात्र फारसा वेग पकडू शकली नव्हती. कारण, आता तर कोरोना गेला असे वाटून बहुतेकांनी ती लस घेण्याचा आळस केला होता. सरकारने आता बूस्टर डोसही स्वस्तात व शक्य झालं तर फुकटात सर्व लोकांना उपलब्ध करायला हवा. नंतर कोरोनाचा फैलाव होऊन अर्थव्यवस्था ठप्प होण्यामुळे जी हानी होईल त्यापेक्षा बूस्टर डोसवर अनुदान देण्याचा खर्च नक्कीच कमी असेल. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांनंतर इतके शहाणपण तरी केंद्र सरकारला आले असावे. नसल्यास किंवा त्याचा विसर पडलेला असल्यास भाजपच्या भक्तांनी आणि जाणकारांनी ते सरकारच्या नजरेस आणून द्यायला हवे. सुदैवाने सध्या बाधितांमध्ये आढळून येत असलेली लक्षणे अगदी सौम्य प्रकारातील आहेत. त्यामुळेच चौदाशेच्या दरम्यान लागण होऊनही शनिवारी पूर्ण राज्यात केवळ एकाच मृत्यू झाला. ही लाट विरून गेली व लक्षणे अधिक तीव्र झाली नाहीत तर ते चांगलेच आहे. पण तसे झाले तरी एक समाज म्हणून त्याला तोंड देण्यास आपण सर्वांनी तयार राहायला हवे. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार प्रति दहा लाख लोकांमागे दर आठवड्याला किमान 980 चाचण्या केल्या जायला हव्यात. आता तरी हे प्रमाण पाळले जायला हवे. मुंबईतून होणारी ये-जा अधिक असल्याने रायगड जिल्ह्यात तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यापूर्वी राज्याच्या विविध भागात विविध प्रकारचे कोविड विषाणू आढळले होते. या प्रत्येकांवर उपचाराची विशेष पध्दत आताच निश्चित केली जायला हवी. गेल्या वेळेस टोसिलीझुमॅब व इतर काही औषधांचा अनिर्बंध वापर झाला. यातली अनेक औषधे अनावश्यक असल्याचे नंतर निष्पन्न झाले. या सर्व प्रकारात रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल तर झालेच पण खर्चही खूप झाला. हे सर्व यावेळेस टाळायला हवे. पावसाळा एरवीही अनेक आजारांना सोबत घेऊन येत असतो. त्यामुळे राज्य सरकारने म्हटल्याप्रमाणे पुढचे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत.
तिसरी लाट?

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
by
Santosh Raul
July 22, 2024