पालिका लावणार तेराशे सीसीटीव्ही कॅमेरे
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महापालिका क्षेत्रात वाढत्या चोर्या, महिलांची सुरक्षा आणि वाहतूककोंडीवर नियंत्रणासाठी पालिका प्रशासन शहरभर 1300 सीसीटीव्ही कॅमरे लावणार आहे. कॅमेरा आणि नियंत्रण कक्ष यासाठी पालिका तब्बल 120 कोटी रुपये खर्च करणार आहे. याबाबत पालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे उभे करा, अशी मागणी पोलीस विभागाकडून केली जात होती. नुकतेच नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हेही यासाठी आग्रही होते. आयुक्त भारंबे आणि पालिका आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांची याबाबत चर्चा झाल्यानंतर सीसीटीव्ही लावण्याच्या प्रक्रियेला वेग आला. शहरातील मुख्य चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे लावले जाणार आहेत. या कॅमेर्यांमधील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाच्या नियंत्रण कक्षासोबत कॅमेर्यांची जोडणी केली जाईल. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. त्यामध्ये महिला सक्षमीकरण व महिलांची सुरक्षा यासाठी प्राधान्याने तरतूद केल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
पनवेल पालिकेच्या मुख्यालयात कॅमेर्यांचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष असेल. वाहतूककोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी कॅमेर्यांमुळे पोलिसांना मदत मिळेल. शहरात रस्त्याने पायी चालताना मोबाइल चोरी व मंगळसूत्र चोरीच्या घटना मागील दोन वर्षांत घडल्या आहेत या गुन्हेगारीला आत्ता आळा बसून आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांना चांगलीच मदत होणार आहे. याकामी 120 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका
शहरभर सीसीटीव्हीचे जाळे व नियंत्रण कक्ष उभारून शहरातील नागरिक आणि विशेषतः महिलांना सुरक्षित करणे हा एक यामागचा उद्देश आहे.