याचे नाव दिवाळखोरी

आपले मित्र, हितचिंतक वा समविचारी यांच्यावरच हल्ला करण्यामध्ये काँग्रेसचा हात कोणीही धरू शकणार नाही. राहुल गांधी यांच्या पदयात्रेदरम्यान हे पुन्हा एकवार दिसून आले आहे. सध्या ही यात्रा केरळमधून जात असून काँग्रेसचे जयराम रमेश वगैरे नेते केरळातील कम्युनिस्ट सरकारवर कोणत्याही थराला जाऊन टीका करीत आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच हुकुमशहा असून ते कोणाचेच ऐकत नाहीत, केरळात कम्युनिस्ट आणि भाजप यांची हातमिळवणी असून काँग्रेसला खच्ची करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत असे तारे रमेश यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत तोडले. केरळमध्ये कम्युनिस्ट आणि काँग्रेस हेच दोन प्रतिस्पर्धी पक्ष आहेत. आळीपाळीने तेच सत्तेत येत असतात. त्यामुळे काँग्रेसने निवडणूक काळात कम्युनिस्टांवर टीका केली तर ते समजण्यासारखे आहे. पण राहुल यांच्या पदयात्रेच्या दरम्यान ही आरोपबाजी कशासाठी?  यातून केवळ काँग्रेसचा सरंजामी माज प्रकट होतो. केंद्रातील मोदी-शहांचे सरकार देशातील लोकशाही संस्थांवर एकामागोमाग एक घाला घालते आहे. विरोधकांचे बोलण्याचे स्वातंत्र्य मर्यादित होत चालले आहे. त्यांच्यामागे इडी किंवा अन्य यंत्रणा लावल्या जात आहेत. देशात सतत हिंदू विरुध्द मुस्लिम असे वातावरण राहावे अशा रीतीने विविध विषय उकरून काढले जात आहेत. काशीतील मशिदीपासून कर्नाटकातील हिजाबपर्यंत असंख्य वाद पेटते ठेवले जात आहेत. राहुल यांची यात्रा या विद्वेषाच्या राजकारणाला छेद देईल व लोकशाही बळकटीकरणासाठी जागृती करील अशी हवा आरंभी तयार झाली होते. त्याचमुळे काँग्रेसच्या बाहेरच्या अनेकांनीही या यात्रेचे स्वागत केले होते. आयुष्यभर काँग्रेसविरोधी राहिलेले योगेंद्र यादव यांच्यासारखे समाजवादी कार्यकर्ते तर प्रत्यक्ष यात्रेत सहभागी झाले. लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र आणण्यासाठी या यात्रेचा उपयोग होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात काँग्रेसला काही हे भान राहिले नाही. जयराम रमेश यांनी याच पत्रकार परिषदेत असेही सांगून टाकले की ही यात्रा विरोधकांचे ऐक्य नव्हे तर काँग्रेस मजबूत करण्यासाठी आहे. काँग्रेस वगळता सर्व विरोधी पक्षांनी भाजपशी कधी ना कधी सहकार्य केले आहे असेही ते म्हणाले. विरोधकांबाबत त्यांनी दाखवलेली तुच्छता म्हणजे खास काँग्रेसी वैचारिक दिवाळखोरी तसेच देशातील राजकीय स्थितीचे भान नसणे किंवा त्याकडे उद्दामपणे दुर्लक्ष करणे होय. काँग्रेस हा प्रदीर्घ काळ सत्ता भोगलेला व म्हणून देशभरातील जनतेला ठाऊक असलेला जुना पक्ष आहे हे खरे आहे. मात्र पूर्वी शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणे या जमीनदारी वाड्याची आता काप गेली व भोके राहिली अशी स्थिती आहे. राजस्थान व छत्तीसगड वगळता देशात कोणत्याही मोठ्या राज्यात काँग्रेस सत्तेत नाही. तेलंगणा, गुजरात, बंगाल, ओरिसा अशा राज्यांमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्याचे अस्तित्व खलास होऊ लागले आहे. महाराष्ट्रातील स्थिती आपल्या सर्वांसमोर आहेच. अशा स्थितीत भाजपच्या विरोधातील लढाई काँग्रेस एकट्याच्या बळावर लढून यशस्वी करणार आहे हा फुकाचा आव आहे. विरोधकांना बरोबर घेण्याची व एकत्र ठेवण्याची भूमिका काँग्रेस बजावू शकेल. मात्र त्यासाठी त्यांना सहकारी पक्षांबाबत उदार दृष्टिकोन ठेवावा लागेल. प्रत्यक्षात उलटेच घडते आहे. ज्या डाव्या पक्षांनी आजवर राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसला सत्तेत व बाहेर सातत्याने साथ दिली त्यांच्यावर अस्थानी व अनाठायी टीका करून काँग्रेसचे नेते अकारण कटुता निर्माण करीत आहेत. तिने त्यांच्या पक्षाचे तर नुकसान होणार आहेच, पण भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचे प्रयत्नही दुबळे होणार आहेत. याच संदर्भात, राहुल यांची यात्रा तब्बल अठरा दिवस केरळमध्ये आणि केवळ एक-दोन दिवस उत्तर प्रदेशमध्ये असे का असा सवाल डाव्या पक्षांनी केला आहे. तो रास्त आहे. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या भाजप-शासित प्रदेशात राहुल फारसे फिरणार नाहीत, ही काही चांगली बाब नाही. या यात्रेचे अजून सुमारे पाच महिने बाकी आहेत. या उर्वरित काळात काँग्रेसने आपल्या नेत्यांची आत्मघातकी प्रवृत्ती आटोक्यात ठेवली तरच या यात्रेतून काही साध्य होईल.

Exit mobile version