| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आ. महेंद्र थोरवे व खा. सुनिल तटकरे यांचे एकत्र असलेले छायाचित्र सध्या मोठ्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरले आहे. कालपर्यंत सुनील तटकरे यांच्यावर व्यासपीठावरून जहरी टीका करणारे, आक्रमक भाषेत हल्लाबोल करणारे, एकमेकांचा डीएनए काढणारे आणि राजकीय संघर्ष पेटवणारे शिवसेना शिंदे गटाचे आ. महेंद्र थोरवे आज अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्जावेळी त्यांच्यासोबत गळ्यात गळे घालून दिसल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे यांचीही उपस्थिती होती. मात्र, कालचे आरोप, टीका आणि संघर्ष विसरून आजची ही अचानक झालेली ‘जवळीक’ नेमकी कशासाठी, असा सवाल कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांच्या मनात उपस्थित झाला आहे.
कालपर्यंत ज्या नेत्यांवर कठोर शब्दांत टीका करण्यात आली, त्याच नेत्यांसोबत कोणतीही भूमिका स्पष्ट न करता एकत्र उभे राहणे म्हणजे राजकीय प्रामाणिकता की उघडपणे सोयीसाठी केलेले समीकरण? हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.
कोणतीही पातळी न ठेवता एकमेकांवर चिखलफेक केल्यानंतर केवळ युतीधर्माच्या नावाखाली त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला जाऊन केलेली गळाभेट ही मतदारांच्या डोळ्यात धूळफेकच नाही का? असा प्रश्न उपस्थित करीत उपहास आणि अविश्वासाचा स्फोट झाला असल्याचे मत काही मतदारांनी व्यक्त केले आहे.
स्थानिक राजकीय वातावरणात या घटनेला थेट ‘यूटर्न राजकारण’ असे संबोधले जात असून, कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा उघडपणे वापर करून शेवटी नेत्यांनीच भूमिका बदलल्याची चर्चा जोर धरत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे जपलेली वैचारिक लढाई आज एका फोटोने प्रश्नचिन्हात उभी राहिली आहे.
राजकीय टीकाकारांचे म्हणणे आहे की, संघर्षाचे राजकारण हे अनेकदा कार्यकर्त्यांना रस्त्यावर ठेवण्यासाठी वापरले जाते, तर अंतिम निर्णय मात्र बंद दाराआड होणाऱ्या “सोयीस्कर समजुतींमध्ये” घेतला जातो. त्यामुळेच आजचे हे चित्र मतदारांसाठी धक्कादायक मानले जात आहे.
विशेष म्हणजे, कालपर्यंत ज्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली गेली, त्या मुद्द्यांवर आज पूर्ण मौन आणि त्याच विरोधकांसोबत मैत्रीपूर्ण उपस्थिती दिसल्याने राजकीय नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या घडामोडीनंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया तीव्र झाल्या असून, “कालपर्यंत शत्रू, आज एकत्र मंचावर?” अशा शब्दांत नेत्यांवर टीका होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे एकच मुद्दा पुन्हा ठळकपणे समोर आला आहे; राजकारणात विचारसरणी महत्त्वाची की केवळ सत्तेच्या समीकरणांनुसार बदलणारी भूमिका?
राजकीय सोयीसाठी कालचे शत्रू आज मित्र होत असतील, तर मतदारांनी कोणावर विश्वास ठेवायचा? कारण, इथे विचारसरणीपेक्षा सत्तेची समीकरणे अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र अधिक ठळकपणे समोर येत आहे.
हा प्रश्न केवळ एका फोटोचा नाही. हा प्रश्न आहे राजकीय प्रामाणिकतेचा आणि सातत्याचा. कारण, जर कालचे आरोप खरे होते, तर आजची जवळीक ही थेट स्वतःच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आणि जर आजची जवळीक योग्य असेल, तर कालचा संपूर्ण संघर्ष हा केवळ स्टेजवरील राजकीय नाटक होता, हे उघडपणे मान्य करावे लागेल. अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्जावेळी दिसलेले हे छायाचित्र आता केवळ एक फोटो राहिलेला नाही. ते राजकारणातील सोयीस्कर भूमिका, बदलती निष्ठा आणि कार्यकर्त्यांच्या भावनांशी केलेला खेळ याचे जिवंत उदाहरण बनले आहे.
Raigad Politics: थोरवे-तटकरे फोटोने राजकीय ढोंगीपणा पुन्हा उघड?
