। पुणे । प्रतिनिधी ।
डाव्या, पुरोगामी चळवळ रुजवायची असेल तर हे विचार प्रथम महिला वर्गापर्यंत पोहोचणे गरजेचे, तरच आपण सत्ता स्थळांपर्यंत पोहोचू, असे प्रतिपादन रायगड जिल्हा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सत्ता परिवर्तन शिबिरात केले.
वर्ग जाती- स्त्रीदास्यांकरिता राजकीय-सांस्कृतिक चळवळीची निकड या विषयावर बोलताना त्यांनी आपले सडेतोड मत व्यक्त केले. त्यांच्याशिवाय दत्ता देसाई (समाज विज्ञान अकादमी), डॉ. पूनम घोनमोडे (बीआरएसपी), यांनीही आपल्या भूमिका मांडल्या. या सत्राच्या अध्यक्षस्थानी भाकपच्या कॉ. स्मिता पानसरे होत्या.
यावेळी चित्रलेखा पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून सहजपणे अनेक मुद्दे मांडत उपस्थितांचे लक्ष वेधले. जर महिलांनी क्रांती घडवून आणली नसती तर आज देशातील महिला सुशिक्षित झाली नसती. पुण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्रांतीमुळे महिलाना शिक्षणाची कवाडे खुली झालीत. त्यामुळे आज आमच्या सारख्या महिलांना उच्च शिक्षण घेता आले, याकडेही त्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले. रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे’ या उपक्रमाबाबतही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. आतापर्यंत या उपक्रमाद्वारे रायगडातील सुमारे 20 हजारांहून अधिक मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आलेले आहे. यामुळे त्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. पुढच्या पिढीला आपल्याला प्रेरणा देणाऱ्यांची माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांचा इतिहास, समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान यांची माहिती होणे गरजेच आहे, असेही चित्रलेखा पाटील यांनी ठामपणे सांगितले.
एका प्रसिद्ध विधीज्ञाने चर्चेसाठी गेले तेव्हा त्यांनी विचारले सावित्रीबाई कोण, यावर निःशब्द होण्याची वेळ आपल्यावर आल्याचेही त्यांनी भाषणातून सांगितले. जर आपल्या महापुरुषांचा इतिहास भावी पिढीला ज्ञात न होणे ही मोठी शोकांतिका असून, त्यामुळे केरळा स्टोरी सारख्या घटना घडल्या तर आश्चर्य वाटायला नको, असेही त्यांनी निदर्शनास आणले. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार हे नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत. ते टिकविण्याची जबाबदारी ही प्रागतिक पक्षांची आहे. महिलांच्या माध्यमातून हे विचार निश्चितच पुढे नेले जातील. यासाठी ते विचार पोहोचविणे ही काळाची गरज आहे. जर आपण हे विचार महिलांमध्ये तिच्या भाषेत सर्वदूर पोहोचविले तर आपोपआच त्या विचारसरणीचे कार्यकर्ते तयार होतील आणि त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून अगदी विधिमंडळ, संसदेपर्यंत प्रागतिक पक्षाचे प्रतिनिधी आपल्याला दिसतील. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचेही चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
बाईपण भारी देवा
चित्रलेखा पाटील यांनी आपल्या भाषणातून ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचा आवर्जून उल्लेख केला. हा सिनेमा खरोखरच महिलांसाठी प्रेरणादायी आहे. सैराटमध्ये जसे सत्य मांडण्यात नागराज मंजुळे यशस्वी ठरले, त्याचप्रमाणे बाईपण भारी देवा या सिनेमाच्या माध्यमातून महिलांबाबत विचार मांडण्यात सिनेमाचे दिग्दर्शक यशस्वी ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.