रोडपाली म्हसोबा तलावात हजारो मासे मृत

प्रदूषणामुळे जलचरांना धोका

| पनवेल | प्रतिनिधी |

कळंबोली वसाहतीतील रोडपाली येथील म्हसोबा देवस्थानच्या तलावात हजारो मासे मृत पावल्याची घटना समोर आली आहे. तलावाच्या पाण्याला दुर्गंधी येत असून, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात झालेल्या मूर्ती विसर्जनामुळे पाणी प्रदूषित झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मृत माशांमुळे परिसरातील दुर्गंधीत आणखी वाढ होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

पनवेल महापालिकेने सुशोभित केलेल्या या तलावात चिलापी, कटला, फंटूस आणि जिताडा यांसारख्या माशांचे संवर्धन करण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन तसेच निर्माल्य आणि घट तलावात टाकल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी तीन ते चार किलो वजनाचे आणि दीड ते दोन फूट लांबीचे मोठे मासेही मृत पावले आहेत. विशेष म्हणजे, नवरात्रोत्सव संपून आठवडा उलटला तरी माशांचा मृत्यू सुरूच असल्याचे नागरिकांनी सांगितले.

तलावात मृत मासे तरंगत असून ते वेळेत न काढल्याने कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता आणखी खालावत आहे. तलावातील विसर्जित मूर्ती, निर्माल्य आणि कचरा तातडीने हटवून संपूर्ण तलावाची स्वच्छता करावी, तसेच उर्वरित माशांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तलावात निर्माल्य टाकण्यास सुरक्षा रक्षकांकडून मनाई केली जात असतानाही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही पुढे आली आहे. दरम्यान, तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी अलिबाग येथील मत्स्य विभागाच्या पथकाकडे पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पनवेल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली.

प्रशासनाची भूमिका : रोडपाली तलावाची पाहणी करण्यात आली असून, मासे मृत होण्यामागील कारणांचा तपास सुरू आहे. एक ते दोन दिवसांत पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक उपाययोजना करून तलावातील माशांचे संरक्षण केले जाईल, असे विलास चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Exit mobile version