। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पेट्रोल दिले नाही या गोष्टीचा राग मनात धरून तिघांना हेल्मेटने मारहाण करून जखमी केल्याची घटना तारा येथील पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विपुल उपाध्ये हे नायरा पेट्रोल पंप, तारा येथे काम करत असताना सौरभ संतोष पांचाळ (रा. रावे) हा त्याच्या मित्रांसोबत नायरा पेट्रोल पंप येथे पेट्रोल घेण्यासाठी आला. त्याला बाटलीत पेट्रोल दिले नाही या गोष्टीचा राग मनात धरून त्याने विपुल उपाध्ये, मॅनेजर आणि पेट्रोल पंपमालक यांना त्याच्याजवळील हेल्मेटने मारहाण केली. तसेच पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी सौरभ पांचाळ, सिद्धेश पाटील, निवृत्ती पाटील, प्रथमेश टावरी या चार जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.