| खोपोली | प्रतिनिधी |
पटेनगर, मिळगांव आदिवासीवाडीत तीन बांगलादेशी महिला आणि आश्रय देणाऱ्या महिलेला खोपोली पोलिसांनी गुरूवार, दि.15 मे रोजी अटक केली आहे. या तिन्हीही बांगलादेशी महिला दहा दिवसांपूर्वी खारघर येथून खोपोलीत वास्तव्यासाठी आल्या होत्या. त्यांना आश्रय देणारी महिलाही बांगलादेशी असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला असून, अटक केलेल्या महिलांना 20 मेपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. खारघर येथून बांगलादेशी महिलांनी खोपोलीकडे मोर्चा वळविल्याने खळबळ उडाली आहे. तर, खोपोली पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशामध्ये बेकायदेशिररित्या प्रवेश करुन बेकायदा अधिवास करणाऱ्या लोकांमध्ये बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. अशा बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम राबविण्याचे आदेश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्यास गोपनिय माहितीच्या प्राप्त झाली. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण, पोसई.के.एस.निकाळजे या पथकाने गुरूवार, दि.15 मे रोजी पटेनगर, मिळगांव आदिवासीवाडीत राहणाऱ्या मरुफा अझर कुरेशी (50) हिच्या घरी बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर धाड टाकली. यावेळी दरवाजा उघड्यासाठी मज्जाव केला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण यांनी पोलिसी खाक्या दाखवताच दरवाजा उघडला. यावेळी सलिना सलीम शेख (40), नजमा सलीमान फकीर (30), पॉपी सलीम शेख (24) तिन्ही रा. जामरील डांगा, कालीया थाना, जि. नाराईल, देश बांगलादेश त्यांच्याकडे पासपोर्ट आणि भारत देशामध्ये प्रवेश करण्याकरिता भारताचा व्हिसा अशा कायदेशीर कागदपत्रांची मागणी केली असता त्यांच्याकडे अशाप्रकारची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे आणि त्यांनी भारत देशामध्ये अनधिकृतपणे व कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय प्रवेश केल्याचे मान्य करीत त्या दहा दिवसापूर्वी खारघर येथून खोपोलीत आल्याचे सांगितले.
आश्रय देणारी महिला मरुफा अझर कुरेशी, 50 वर्षे, रा. मिळ कातकर वाडी, पटेलनगर हीदेखील बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय आहे. त्यांच्याविरुध्द खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण, पोसई.श्री.के.एस. निकाळजे, पोना सतीश बांगर, आशा भोये, पोकॉ स्वप्नील लाड, पोकॉ प्रणित कळमकर यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे करीत आहेत.