सावधान! रायगड जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात तिघांना गोवरची लागण

। पनवेल । वार्ताहर ।

मुंबई आणि ठाणे महानगरपालिका हद्दीपाठोपाठ आता पनवेल महानगरपालिका हद्दीत गोवर आजाराचा शिरकाव झाला आहे. पालिका हद्दीत गोवरचे तीन रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांचे वय पाच वर्षाच्या खाली असल्याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. हे तीनही रुग्ण बरे असून त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

पनवेल महानगर पालिका हद्दीत आता गोवर आजाराचा शिरकाव झाल्याचे आढळुन आले आहे. बुधवारी पालिका हद्दीतील पनवेल, नवीन पनवेल आणि तक्का परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत. पालिका हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची तपासणी केल्यानंतर या रुग्णाची माहिती मिळाली.

पालिकेच्या वैद्यकीय टीमने अधिक तपास केल्यानंतर 16 संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिकेच्या प्रभारी अधिकारी डॉ. मुजावर यांनी दिली आहे. या सर्व रुग्णांवर त्याच्या घरीच उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.

ताप आल्यास संपर्क साधा
पनवेल महानगरपालिका हद्दीत गोवर आजाराचे 16 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच्या रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्या व्यतिरिक्त तीन रुग्णांना गोवरची लागण झाली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याला ताप येत असेल तर त्याच्यावर लगेच उपचार सुरू करावेत आणि याची माहिती जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यावी, असे आवाहन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. रहेना मुजावर यांनी केले आहे.

पालिकेकडून उपाययोजना सुरू
पनवेल पालिका हद्दीत गोवर आजाराचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग कामाला लागला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून पालिकेने डोअर टू डोअर सर्व्हे सुरू केला आहे. या सर्व्हेमध्ये तापाचा रुग्ण आढळून आल्यास त्याची तपासणी करून, रक्ताची तपासणी केली जाते आणि हा आजार गोवर आहे का? याची शहानिशा केली जात आहे. पालिका हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून हा सर्व्हे केला जात आहे.

Exit mobile version