जीव धोक्यात घालून तिघांचे प्राण वाचवले

पुराच्या पाण्यातून कार सुखरूप बाहेर काढली; भैरवनाथ मित्र मंडळ परळीच्या मुलांची कामगिरी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. पालीसह तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते, सखोल भागातील घरे व नदी पुलांना महापुराच्या पाण्याने वेढा दिला. अशातच परळी घोटवडे अंबा नदी पुलावर पुराच्या पाण्यात चक्क कार अडकली. कारमध्ये असलेली पोलीस महिला व दोन विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकून पडल्याने त्यांनी मदतीसाठी धावा केला. यावेळी जवळपासच्या तरुणांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदतकार्य सुरू केले. भैरवनाथ मित्र मंडळ परळी येथील तरुणांनी दोर बांधून अविरत व शर्थीचे प्रयत्न करून कार पुरातून सुखरूप बाहेर काढली. बराच वेळ महापुरात काळजाचा ठोका चुकविणारा थरार सुरू होता.

मात्र, तरुणांच्या व स्थानिकांच्या मदत कार्याने मोठा अनर्थ टळला. सदर महिला आपल्यासोबत नातेवाईक असलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन कारने जात होती. पुलाचा मधला भाग पूर्णपणे झुकला असल्याने कार पुलाच्या मधोमध आल्यावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. चहूबाजुनी कारला पुराच्या पाण्याने वेढा दिला. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने मदतीसाठी याचना केली. यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून तरुणांनी महापुरात अडकलेल्या तिघांचे प्राण वाचवले. तरुणांची वेळीच मदत मिळाली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे देवदूत बनून आलेल्या या जाबाज तरुणांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

परळी ते घोटवडे गाव व सभोवतालच्या आदिवासी वाड्या पाड्यांना जोडणारा घोटवडे नदी पूल जुना व जर्जर झाला आहे. पुलाचा मधला भाग पूर्णपणे झुकला आहे. या पुलावर वारंवार अपघाती घटना घडत आहेत. वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक संघटनांनी वारंवार केली. मात्र, या नवीन पुलाचे काम होत नसल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. लवकरात लवकर मंजूर झालेल्या नवीन पुलाचे काम करावे. अन्यथा या प्रश्नावर जनआंदोलन छेडू.

– संदेश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते, घोटवडे ग्रामस्थ

Exit mobile version