परळी येथील घटना; आरोपीला मुद्देमालासह अटक
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील परळी या गावातून एका घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. पाली पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्च ते 1 एप्रिलच्या दरम्यान ही घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे, भावाच्या मेहुण्यानेच ही चोरी केली. या चोराला पाली पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुल तुकाराम काळभोर, मूळगाव घोटावडे असून, सध्या ते परळी, ता. सुधागड येथे आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या घरातील कपाटातून दोन तोळे दोन ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी पाली पोलीस ठाण्यात दिली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावाचा मेहुणा ऋषिकेश रामचंद्र मांडवकर, रा. उंबरवाडी, माणगाव बुद्रुक, ता. सुधागड यांच्यावर संशय व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी, पोलीस हवलदार दीपक पाटील, पोलीस शिपाई अजित लामखेडे, श्री. भापकर व श्री. बजबळकर यांनी या संशयित फरार आरोपीचा तपास सुरू केला. ऋषिकेश मांडवकर हा खोपोलीत असल्याची माहिती मिळताच पाली पोलिसांनी आपली टीम पाठवून खोपोलीतून ऋषिकेश मांडवकर याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला अटक करून दोन तोळे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले असा गुन्ह्यातील 1 लाख 25 हजार रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल पंचनाम्यान्वये त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.आरोपीवर पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.