महसूल विभागाची कारवाई
| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील नांदगाव समुद्रकिनारी कोणती रॉयल्टी वा परवानगी न घेता बिनदिक्कतपणे रेती उत्खनन होत असून, सरपंच सेजल घुमकर व ग्रामस्थांच्या सजगतेने महसूल विभागाने कारवाई करत पाच ब्रास रेतीसाठा बैलगाडीसह ताब्यात घेतला आहे.
नांदगाव समुद्रकिनारी रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान गट नं.692/2 या जमीर अ.इब्राहिम अनवारे यांचे नावे असलेल्या मिळकतीमध्ये अंदाजे पाच ब्रास रेतीसाठा आढळून आला. त्याबद्दल त्यांच्याकडे कोणतीही रॉयल्टी वा परवानगी चौकशी केली असता आढळून आलेली नाही. या मिळकतीत रेतीने भरलेली बैलगाडीसुद्धा आढळून आली आहे.
समुद्रात रेतीउपसा हा दररोज सुरु असून, संबंधितांना रेती अडवणूक करायला ग्रामस्थ गेले असता, रेतीमाफिया ग्रामस्थांना धमकी देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तरी, संबंधितांवर कठोर कारवाई करावी व दंड ठोठावा, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच सेजल घुमकर, तुषार दिवेकर, महेश मापगावकर, हर्षद दळवी यांनी केली आहे. यावेळी तलाठी अरविंद देशमुख, पोलीस पाटील विश्वास महाडिक उपस्थित होते.