। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील खंडाळा येथे सुसज्ज आगरी भवन उभारणार असल्याची घोषणा शेकाप युवा नेते, उद्योजक, भाऊ प्रभाकर पाटील यांचे नातू नृपाल पाटील यांच्यावतीने शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील ऊर्फ चिऊताई यांनी केली आहे. कुर्डूस येथील श्रीराम मंदिराच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला होता. स्वर्गीय नारायण नागू पाटील यांच्या नावाने हे आगरी भवन उभारण्यात येणार असून, आगरी भूमीपुत्रांनी आपल्या समाजासाठी केलेला त्याग, महती पुढच्या पिढीला समजण्यासाठी म्युझियम करणार असल्याचे आगरी सामाजिक संस्था अलिबागचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश भोपी होते. प्रमुख अतिथी म्हणून शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य महिला आघाडीच्या प्रमुख, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हाध्यक्ष तथा आवाज महामुंबईचा चॅनेल संपादक मिलिंद खारपाटील, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत कैलास पिंगळे आणि संस्थेच्या अन्य पदाधिकार्यांनी केले.
आगरी सामाजिक संस्थेची वाटचाल, पर्यटनदृष्टीने अलिबाग तालुक्यातील कुर्डूस परिसर कसा समृद्ध आहे हे जयश्री म्हात्रे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले. नारायण नागू पाटील यांनी शेतकर्यांसाठी केलेला चरीचा संप आणि ब्रिटिश सत्तेला हादरवणारा चिरनेर येथील जंगल सत्याग्रह आगरी समाजातील लोकांनीच केला असल्याचे अधोरेखित केले. आगरी सामाजिक संस्था अलिबागचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी, संकटाशी न डगमगता सामना करतो तो आगरी. अलिबागच्या पाटीलबंधूंनी रायगड जिल्ह्यात शिक्षणाची ज्ञानगंगा आणल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी चित्रलेखा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. मात्र, येथील स्थानिक भूमीपुत्र त्या जागेचा मालक राहिला पाहिजे, नोकर नको, असे सांगितले.
शेकाप राज्य महिला आघाडीच्या प्रमुख, माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, आगरी सामाजिक संस्थेने जे छोटेसे रोपटे लावले होते, त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. आगरी समाज हा जिद्दी समाज आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील या पाटील कुटुंबियांच्या वतीने अलिबागेत आगरी भवन होणार आहे. आगरी संस्कृती, कला पुढे आणण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. अध्यक्षीय भाषणात सुरेश भोपी यांनी आगरी समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून, आता वज्रमूठ आवळली पाहिजे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात पंचवीसहून अधिक जणांचा सत्कार झाला. यामध्ये प्रकाश मिसाळ, सुरेश खडपे, कवी अरुण म्हात्रे आणि कृष्णा जोशी, प्रा. नम्रता पाटील, प्रभावती पाटील यांचा समावेश आहे. तसेच दहा धवळारनींचा हृद्य सत्कार चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणार्या मान्यवर दत्तात्रय पिंगळे, जगन्नाथ राऊत, सुशिला पाटील, पद्माकर म्हात्रे, संदेश पाटील, जीवन पाटील, मनोहर पिंगळे, सुभाष शेळके, अरुण मोकल, डॉ. नितीन मोकल, प.सा. म्हात्रे, संजय पोईलकर, स्वर्गीय विद्याधर निळकर या सगळ्यांना आगरी समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. शेवटी संस्थेच्या सचिव रेखा मोकल यांनी आभार मानले.