| पनवेल/माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात पनवेल आणि माणगाव तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल येथील वाहनांच्या अपघातात दुचाकी पुलावरुन खाली कोसळून दुचाकीस्वार ठार झाला, तर दोघे जखमी झाले. तर, माणगाव येथील अपघातात ट्रेनने तरुणाला दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. संबंधित पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पहिला पनवेल येथे झाला असून, मुंबई-गोवा महामार्गावरील तारा गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने आलेल्या चारचाकी वाहनाने समोरून जाणार्या दोन दुचाकी आणि एका रिक्षाला समोरून जोरात धडक दिली. ही धडक एवढी भयंकर होती की, अपघातग्रस्त दुचाकी चक्क पुलावरून खाली पडली. त्यावरील प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. यातील एक प्रवासी मयत पावला आहे. तर, इतर दोघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तारा गावाच्या हद्दीत पेणकडून पनवेलच्या दिशेने जात असलेले चारचाकी वाहन अतिवेगात विरुद्ध दिशेने जात असताना, तारा गावाच्या हद्दीजवळ पुलावर पनवेलकडून पेणच्या दिशेने येत असलेल्या दोन मोटारसायकलसह एका रिक्षाला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यातील एक मोटारसायकलवरील दोन प्रवाशांसह एक चिमुकली पुलावरून सुमारे 30 फूट खाली पडल्याने तिन्ही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना पनवेल येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. यामध्ये आदिती सिंग (28) हिचा मृत्यू झाला आहे. तर गौरी खैरनार (10), सलमान शहा (27) हे जखमी झाले आहेत. या अपाघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दुसरा अपघात माणगाव येथे झाला. रेल्वेची धडक लागून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सविस्तर वृत्त असे की, दि. 6 एप्रिल रोजी रात्री 2.42 वाजता 12450 गोवा संपर्क क्रांती या गाडीच्या समोर आल्याने इंदापूर किमी स्टोन क्रमांक 24/2, 24/3 दरम्यान मयत सचिन कृष्णा मुंढे, (30 ), रा. कशेणे यास ठोकर लागून लहान मोठ्या गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. राठोड करीत आहेत.