गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट; रानभाज्या विक्रीतून महिलांना रोजगार
| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला सोमवारी (दि.31) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भाविकांनी गर्दी केली होती. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच लांब रांगा लागल्या होत्या. संकष्टी चतुर्थी आणि श्रावण सोमवार असल्यामुळे हाजारो भाविक दाखल झाले होते.
बल्लाळेश्वर मंदिर व गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. बल्लाळेश्वरला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून व भारतातून भाविक दाखल झाले होते. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल झाली असून येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत.
भाविकांमुळे येथील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग बोर्डिंग वाले, पापड, लोणचे मिरगुंड विक्रेते, पेढेवाले, रानभाज्या, छोटे मोठे दुकानदार व इतर व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. विविध वस्तूंनी भरलेली दुकाने व गर्दी यामुळे मंदिर परिसर गजबजलेला दिसत होता. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. अनेक भाविक स्वतःची वाहने घेवून आले होते. तर काही लक्झरी किंवा खासगी बसेसने आले. यामुळे पालीतील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. या भाविकांनी दुकानातून चांगली खरेदी केली. त्यामुळे धंदा चांगला झाला आहे.
प्रसाद साठे,
व्यावसायिक
भाविकांच्या येणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन योग्य व्यवस्थापन व नियोजन करण्यात आले होते. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षारक्षक तैनात आहेत. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त आधुनिक भक्तनिवास आहेत. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. देवस्थान ट्रस्टतर्फे सर्वतोपरी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
जितेंद्र गद्रे,
अध्यक्ष, बल्लाळेश्वर, देवस्थान ट्रस्ट, पाली
