हजारो कि.मीं.चा प्रवास निष्फळ
घरे उद्ध्वस्त, पिल्लांचा मृत्यू
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
रायगड जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे माणसांसह पशुपक्ष्यांचीही वाताहत झाली आहे. तबेट, भूतान व श्रीलंका या देशातून हजारो कि.मीं.चा प्रवास करून जिल्ह्यात पाहुणा म्हणून येणारा तिबोटी खंड्या (जीळशपींरश्र ऊुरीष ज्ञळपसषळीहशी) या पक्ष्यालादेखील या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील काही पक्षी अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणावरून पूर व अतिवृष्टीमुळे तिबोटी खंड्याची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच पिल्लेदेखील मृत्युमुखी पडली आहेत. याबाबत पक्षीप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
माणगाव विळे येथील पक्षी अभ्यासक राम मुंढे यांनी सांगितले, की तिबोटी खंड्याच्या काही घरट्यांचे जूनच्या सुरुवातीपासून पक्षी अभ्यासक राम मुंढे हे निरीक्षण करत होते. मादीने अंडी दिल्यापासून ते अंड्यातून पिल्लं बाहेरपडेपर्यंत त्यांचे सतत दोन महिने निरीक्षण चालू होते. त्यातच सलग चार ते पाच दिवस अतिवृष्टी झाल्याने त्या पावसाचे पाणी या पक्ष्याच्या घरट्यात घुसून ते घरटे ढासळले व त्यातील पिल्लं जागेवर मरण पावली. अगदी काही दिवसांत ही पिल्लं भरारी घेण्याच्या तयारीत असताना या निसर्गाचा फटका या निष्पाप जीवांना बसला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. यासारखी अनेक घरटी या मुसळधार पावसामुळे उन्मळून पडली आणि या पक्ष्यांवरदेखील संकट ओढवले आहे. विणीचा हंगाम निघून गेला. पिल्ले मरण पावली, यामुळे या प्रजातीच्या वाढीस बाधा आली आहे.
अनोखा संघर्ष
हजारो किलोमीटरचा प्रवास करून या पक्ष्याचे जूनच्या सुरुवातीस जिल्ह्यात आगमन होते. साधारणतः पावसाचा आणि उपलब्ध होणार्या खाद्याचा अंदाज घेऊन तो छोट्या- छोट्या ओव्हळाच्या कडेला गर्द झाडीत सुमारे 2-3 फूट बिळ पाडून आपले घरटे बनवतो. या घरट्यात मादी 5 ते 6 अंडी देते. आपली उपजीविका भागवत दोघे मिळून ती अंडी उबवतात. साधारणतः 18 दिवसांनंतर या अंड्यातून पिल्लं बाहेर येतात आणि अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लांना खाद्य भरवण्यासाठी नर व मादी मिळून छोटे छोटे मासे, खेकडे, गवतावरील कीटक, छोट्या आकाराच्या चोपयी म्हणजेच सापसुरुळी, छोटी-छोटी बेडके असे विविध भक्ष्य पकडून आपल्या पिल्लांची भूख भागवताना दिसून येतात. मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले.
हिरमोड
या पक्ष्यांची एक छबी कॅमेर्यात टिपण्यासाठी पक्षी छायाचित्रकार अक्षरशः उतावळे झालेले असतात. यंदा माणगाव विळे-भागाड भागात काही पक्षी निरीक्षक व छायाचित्रकार तिबोटी खंड्याची व त्याची पिल्ले यांची छायाचित्रे घेण्यासाठी व निरीक्षण करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनादेखील घरटी उद्ध्वस्त झालेली दिसली. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला.