रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने पनवेल रेल्वे स्थानकावर गुरूवारी (दि.23) कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रेल्वे स्थानक व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स उभारून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. बंदोबस्तासाठी गॅसगन पथक, हेल्मेटसह लाठी पथक, लाठी-ढाल पथक तसेच रायफलधारी पथक तैनात करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि 30 पोलीस अंमलदार तैनात होते. तसेच लाठी, ढाल, गॅसगन, स्ट्रेचर, मेगाफोन आणि 50 रबरी राऊंडसह दोन रायफलची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय पनवेलचे 1 सहाय्यक सुरक्षा आयुक्त, 4 अधिकारी आणि 18 कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. शहर पोलीस ठाण्याशी समन्वय साधून संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली होती.

Exit mobile version