महापुरात आलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र

महाड, पोलादपूर व चिपळूण स्वच्छ करण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सज्ज

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या मार्फत पूरग्रस्त भागातील स्वच्छता मोहीम सोमवार पासून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये महाड, पोलादपूर व चिपळूण या ठिकाणी दररोज १५०० हून अधिक सदस्य स्वच्छता करण्यासाठी येत आहेत. रायगड जिल्हातील महाड, पोलादपूर व रत्नागिरी जिल्हातील चिपळूण शहरामध्ये महापुराच्या पाण्याचा प्रवाह २० फुटांपेक्षा जास्त आल्याने प्रवाहातील गाळ, चिखल, माती, दगड, झाडे झुडपे, प्राणी व अन्य कचरा, वाहने, घरातील वस्तु, किराणा दुकानातील नाशिवंत माल हा वस्तीत व रस्त्यावर पसरलेला आहे. या सर्व वस्तु उचलण्यापासून ते रस्त्यावरती साचलेला गाळ यांची विल्हेवाट लावण्यासाठी पुरग्रस्थ भागामध्ये स्वच्छता अभियानाचे नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी (पद्मश्री पुरस्कार सन्मानित) तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्थ श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सदर स्वच्छता अभियानासाठी सकाळपासून प्रतिष्ठानचे सदस्य अथक काम करत आहेत. तसेच शहरातील शासकीय कार्यालये देखील पुराग्रस्थ झाल्याने त्यांमधील गाळ व दस्तऐवज काढण्याकामी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र आले आहेत. सदर स्‍वच्‍छता अभियानाच्‍यावेळी स्वत:चा जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल तसेच सॅनिटायझर, माक्स याचा योग्य वापर करत स्वच्छतेचे काम सुरू आहे.

डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत सातत्याने सामाजउपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि संवर्धन, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, दाखले वाटप, शैक्षणीक साहित्य वाटप, अंध व मुखबधीर विद्यार्थांना मदत. उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर, पाणपोई व बसथांबे, आपतग्रस्तंना मदत यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात.
२० जुलैच्या महापुराने झालेली अस्वच्छता संपूर्ण स्वच्छ करण्याचे नियोजन प्रतिष्ठानने केले आहे. महाड येथे दोन दिवसामध्येच प्रतिष्ठानच्या वतीने ९ जे.सी.बी. यंत्रे, २८ डंम्पर, ११ ट्रॅक्टर व ३१०० पेक्षा जास्त सदस्यांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानासाठी महाड नगर परिषद, पोलादपूर व चिपळूण प्रशासनाने सहकार्य केले आहे. हे नियोजन स्वच्छता पूर्ण होई पर्यंत राहील.

Exit mobile version