कामोठ्यात शौचालय बनले ‌‘लॉजिंग‌’

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी उभारलेले शौचालय सध्या चक्क ‌‘लॉजिंग‌’मध्ये रूपांतरित झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शौचालयाच्या इमारतीत सोफा, वॉशिंग मशीन, किचनसह इतर सुविधा उभारण्यात आल्याचे दिसून येत असल्याने या संपूर्ण प्रकारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेतृत्व सुनील गोवारी यांनी या प्रकाराची व्हिडीओच्या माध्यमातून पोलखोल केली आहे. नागरिकांच्या करातून कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुविधांचा नेमका वापर कशासाठी होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

‌‘शौचालयाच्या नावाखाली कंत्राट, सुविधा मात्र लॉजिंगच्या!‌’ असा आरोप करत गोवारी यांनी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला आहे. सार्वजनिक निधीचा अशा पद्धतीने वापर होत असेल तर त्याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणीही त्यांनी केली. विशेष म्हणजे, शौचालयाच्या ठिकाणी सोफा, वॉशिंग मशीन आणि किचनसारख्या सुविधा कशासाठी उभारण्यात आल्या? या कामासाठी कोणत्या निधीतून किती खर्च झाला? कामाचे अंदाजपत्रक काय होते? प्रत्यक्षात मंजूर आराखड्यानुसारच बांधकाम झाले का? याची महानगरपालिकेने तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.

गोवारी यांनी या प्रकारावर बोचरी टीका करताना, एवढेच करायचे असेल तर या आलिशान शौचालयावर आणखी चार मजले बांधा आणि तेही लॉजिंगमध्ये रूपांतरित करा, असा टोला पनवेल महानगरपालिकेला लगावला. दरम्यान, सार्वजनिक शौचालयाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर कारवाई होणार का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. महापालिका प्रशासन या ‌‘शौचालय लॉजिंग‌’ प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार की या प्रकाराकडेही नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार? याकडे आता पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version