नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी-दांड तसेच मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील दांडफाटा रिक्षा स्टँडजवळील सार्वजनिक शौचालयाचे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रिक्षाचालक, प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि कामगारांना या अस्वच्छतेचा दररोज त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शौचालयाच्या ड्रेनेज व्यवस्थेची दुरवस्था झाल्याने घाण पाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे दुर्गंधीसोबतच साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असून, संबंधित प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकाराबाबत पत्रकार राकेश खराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, करदात्या नागरिकांना अशा अस्वच्छ परिस्थितीत जगण्यास का भाग पाडले जात आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच येत्या तीन दिवसांत शौचालयाचे सांडपाणी रस्त्यावर येणे बंद करून ड्रेनेज लाईन व तुंबलेले पाणी साफ न केल्यास परिसरातील नागरिक, महिला आणि रिक्षाचालकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
