सर्व एमएच-06, एमएच-46 वाहनांना सूट नाही
| पेण | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाक्यावर वाहनधारकांना टोलमाफी मिळाल्याचा दावा करत गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही राजकीय मंडळींकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात येत होता. एमएच-06 आणि एमएच-46 पासिंगच्या सर्व वाहनांना टोलमाफी अशा पोस्ट व्हायरल करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न काही चमकू नेत्यांकडून सुरू होता. मात्र प्रत्यक्ष खारपाडा टोल नाक्यावर जाऊन केलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये वास्तव काही वेगळेच समोर आले आहे.
टोल नाक्यावर प्रत्यक्ष पाहणी करून तेथील टोल कंपनीचे व्यवस्थापक राजेश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली असता, टोलमाफीबाबतची खरी माहिती समोर आली. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, ही सूट सर्व एमएच-06 किंवा एमएच-46 वाहनांसाठी नसून पेण शहराच्या आसपास 20 किलोमीटर परिघात राहणाऱ्या स्थानिक वाहनधारकांसाठीच लागू करण्यात आली आहे.
म्हणजेच फक्त वाहनाचा नंबर एमएच-06 किंवा एमएच-46 असल्यामुळे टोलमाफी मिळणार नसून संबंधित वाहनधारक हा निर्धारित स्थानिक परिघात राहत असल्याचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सोशल मीडियावर करण्यात आलेला सर्व वाहनांना टोलमाफी हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती न घेता काही राजकीय मंडळींनी स्वतःचे श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर मोठमोठ्या पोस्ट टाकत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप आता नागरिकांकडून होत आहे. सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळत खोटा गाजावाजा करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
या ग्राउंड रिपोर्टमुळे आता खारपाडा टोलबाबतचे वास्तव सर्वसामान्यांसमोर आले असून, सोशल मीडियावरील दाव्यांपेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती किती वेगळी असते हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
