सतर्क राहण्याचे वनपालांचे आवाहन
| पेण | प्रतिनिधी |
खारपाडा गावाच्या हद्दीतील शिवाई मंदिराच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने या भागातील नागरिक धास्तावले आहेत. दरम्यान, जोपर्यंत याबाबत शहानिशा होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन वनविभागाकडून वनपाल कुलदीप पाटकर यांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास वनपाल कुलदीप पाटकर यांना माहिती मिळताच रात्रभर त्यांनी त्यांच्या सहकार्याच्या सहाय्याने परिसरात गस्त घातली. मात्र, कोठेही वाघ असल्याच्या खुणा आढलल्या नाही. मात्र, उरण चिरनेर येथील महिला मनिषा ज्या स्वतः शिक्षक आहेत, त्यांनी त्यांच्या गाडीसमोरून बिबट्याला जाताना पाहिल्याचे त्यांनी खात्रीलायक सांगितले आहे.
सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, आपले पाळीव प्राणी ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी लाईट चालू ठेवा, घराचे दरवाजे बंद करून घ्या, जोपर्यंत मिळालेल्या माहितीची शहानिशा होत नाही, तोपर्यंत खारपाडा, दुष्मी, खरोशी, जिते, खैरासवाडी या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच अंधार पडल्यावर घराबाहेर पडू नये, असे आवाहन कुलदीप पाटकर यांनी केले आहे. बिबट्या दिसल्याच्या माहितीवरून खारपाडा पंचक्रोशीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तरी, अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्व यंत्रणा आपल्या परिसरात गस्त घालत आहेत. त्यामुळे सतर्क राहून स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन दुष्मी सरपंच रश्मी भगत यांनी नागरिकांना केले आहे.