जुलैच्या अतिवृष्टीत मोठे नुकसान; साडेनऊ हजार क्षेत्रातील भातपिकाला फटका
| अलिबाग | प्रमोद जाधव |
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. लागवडीसाठी तयार झालेली रोपे पाण्यात वाहून गेली. 925 गावांमधील 24 हजार 77 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नऊ हजार 855 हेक्टर भातपीक क्षेत्राला त्याचा फटका बसला. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा लागून राहिली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये भातपीक लागवडीचे 95 हजार हेक्टर क्षेत्र आहे. पावसावर अवलंबून राहून 95 टक्के शेतकरी भातपिकाची लागवड करतात. यंदा पाऊस पंधरा दिवस उशिरा पडल्याने भात बियाणांद्वारे पेरणी करण्यास विलंब झाला. पेरणी केलेल्या भाताची रोपे लावणी योग्य तयार झाली. शेतकरी भात लावणीच्या कामांमध्ये मग्न राहिला. मात्र, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस पुन्हा सक्रीय झाला.
पावसामुळे धरणेे पाण्याने भरून गेली. प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. पावसाचा जोर सुरु राहिल्याने शेतातील बांधावरून पाणी वाहू लागले. संपूर्ण शेती पाण्याने तुडूंब भरून गेली. त्याचा परिणाम भातपिकावर होऊ लागला. सतत सुरु असलेल्या पावसामुळे भाताची रोपे कुजून गेली. भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे 925 गावांतील 24 हजार 77 शेतकऱ्यांना फटका बसला. नऊ हजार 855.38 हेक्टर क्षेत्राची हानी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार, गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्या मदतीने नुकसानीचे पंचनामे तयार करण्यात आले. पंचनामे तातडीने करून नुकसानीचा अहवाल गाव पातळीवरून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालायत पाठविण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून महिन्याभरापूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या दणक्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. भरपाई कधी मिळेल याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. सुमारे आठ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी
सहाशे पशुधनाची हानी
अतिवृष्टीमुळे गाय, म्हैस, कोंबड्यांसह सुमारे 605 पशु-पक्ष्यांची हानी झाली आहे. त्यात 456 कोंबड्या, 75 मोठी जनावरे, 77 लहान जनावरांचा समावेश आहे. या पावसात पाळीव जनावरांसह कोंबड्या, बकऱ्यांचेदेखील नुकसान झाले आहे.
392 घरांचे नुकसान
जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यात कच्ची, पक्क्या घरांचा समावेश आहे. काही घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. काहींच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत, तर काही घरांची पत्रे तुटलेले असल्याची माहिती समोर येत आहे.
अतिवृष्टीमुळे घरांसह जनावरांच्या हानीमध्ये सर्वात जास्त संख्या इर्शाळवाडीमधील आहे. ही भरपाई तातडीने देण्यात आली आहेत. भातशेतीच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे.
संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी