पाच दिवसांत सव्वा आठ कोटींचा साठा जप्त
| अलिबाग | प्रतिनिधी |
रत्नागिरीनंतर रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी गेल्या पाच दिवसांपासून चरसची पाकिटे सापडू लागले आहेत. श्रीवर्धननंतर आता मुरुड व अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी चरसची पाकिटे सापडली आहेत. दरम्यान, पाच दिवसांत आठ कोटी 36 लाख 52 हजार 800 रुपये किंमत असलेली 175 पाकिटे मिळून आलीत. त्यामुळे चरस सापडण्याचे सत्र सुरुच असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीसह काही समुद्रकिनारी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चरसची पाकिटे सापडली होती. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील सागरी किनारी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुुरू केले. जिल्ह्यातील 17 सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्रकिनारी सुमारे 85 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले. त्यावेळी 27 ऑगस्ट रोजी श्रीवर्धनमधील जीवन समुद्रकिनारी 41 लाख 54 हजार 400 रुपयांची चरसची पाकिटे सापडली. या घटनेनंतर जिल्ह्यात अधिक सतर्क राहण्याचा इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला. त्यानुसार स्थानिक मच्छिमार, तटरक्षक दल व अन्य यंत्रणेची मदत घेत पाकिटांचा शोध सुरुच ठेवला. श्रीवर्धनमधील मारळ, सर्वेसागर, कोंडिवली, दिवेआगर, आदगाव या ठिकाणी पुन्हा चरसचा साठा सापडला. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी मुरुड तालुक्यातील कोर्लई, अलिबाग तालुक्यातील थेरोंडा या ठिकाणी व 31 ऑगस्ट रोजी आक्षी समुद्रकिनारी तसेच श्रीवर्धनमधील नानिवली समुद्रकिनारी पुन्हा चरसची पाकिटे सापडली. 27 ते 31 ऑगस्ट या पाच दिवसांच्या कालावधीत आठ कोटी 36 लाख 52 हजार 800 रुपये किमतीची 209 किलो वजनाचा चरसचा साठा सापडला आहे.
आक्षी समुद्रकिनारीसुद्धा पाकिटे
अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील समुद्रकिनारी गुरुवारी दुपारी चरसची सहा पाकिटे सापडली आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्यासह त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. किनारी सापडलेली चरसची पाकिटे ताब्यात घेऊन त्यांचे वजन करणे. पंचनामे करणे आदी प्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेची माहिती महसूल विभागाला मिळताच त्यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याचा इशारा स्थानिकांना दिला आहे. कोणाला अशा प्रकारची पाकिटे दिसून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार करीत आहेत.