माथेरानमध्ये पर्यटकाची आत्महत्या; अलेक्झांडर पॉईंटवरील दरीत मारली उडी

1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश

। नेरळ/माथेरान । प्रतिनिधी ।

माथेरानमध्ये अंबरनाथ येथून तीन तरुण पर्यटनासाठी आले होते. यापैकी एका तरुणाने माथेरानमधील अलेक्झांडर पॉईंट येथील खोल दरीत उडी मारली. घटना घडल्यानंतर तब्बल आठ तासांनी पोलिसांनी रेस्क्यू टीम यांच्या मदतीने त्या तरुणाचा मृतदेह 1500 फूट खोल दरीतून बाहेर काढला.

अंबरनाथ येथील सोनू जनकराम गौतम (21) हा तरुण आपला मित्र नासिर हुसेन खान आणि भाऊ अर्जुन जनकराम गौतम यांच्यासह माथेरान येथे पर्यटनासाठी आला होता. हे सर्वजण माथेरान येथील अलेक्झांडर पॉईंट येथे गेले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोनू गौतम याने तेथील खोल दरीत उडी घेतली. त्यावेळी असलेले धुके यामुळे गौतम यांची काहीही माहिती मिळत नसल्याने नासिर खान या मित्राने माथेरान पोलिसांना याबाबाबत माहिती दिली. माथेरान पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सरिता मुसळे यांनी सह्याद्री रेस्क्यू टीम यांना पाचारण करून घेतले. त्यानंतर अंधार पडला होता आणि माथेरान डोंगर रांगेत धुक्याची दुलई पसरल्याने पोलिसांना त्या तरुणाचा शोध घेणे कठीण जात होते. रेस्क्यू टीम यांनी प्रयत्नांची शर्थ करीत 1500 फूट खोल दरीत काळाकुट्ट अंधारात मोहीम यशस्वी केली.

या दुर्घटनेत सोनू गौतम याच्या डोक्याला, हाताला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून माथेरान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Exit mobile version