| अलिबाग | प्रतिनिधी |
मुंबईतील एका तरुणीशी मैत्री करून तिला लग्नाचे अमिष दाखविण्यात आले. शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर ठेवले. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात नंदूरबार येथील एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा सर्व प्रकार अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे 2021 ते 2025 या कालावधीत घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी ही मुंबई येथील रहिवासी असून, आरोपी हा नंदूरबार येथील रहिवासी आहे. या दोघांची मैत्री हॅलो ॲपद्वारे झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्यास सुरुवात केली. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे दोघेजण एकमेकांना भेटत राहिले. दोघांमधील जवळीकता वाढली. लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्याच्यापासून ती गरोदर राहिली. मात्र, त्याने ती जबाबदारी घेण्यास नकार दिला. दरम्यान वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून सुमारे 25 लाख रुपये घेऊन ते देण्यासही त्याने टाळाटाळ केली. सोशल मिडीयावर झालेल्या ओळखीमध्ये तरुणीची आर्थिक फसवणूक करण्याबरोबरच तिला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक झाल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






