माथेरानच्या दस्तुरी नाका येथील पर्यटक माहिती केंद्र बंद

| नेरळ । वार्ताहर ।
माथेरान या पर्यटन स्थळी येणार्‍या पर्यटकांना माथेरान पर्यटन स्थळाची माहिती देण्यासाठी माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने माहिती केंद्र बनविले आहे. हे माहिती केंद्र कोरोना काळापासून बंद असून त्यामुळे माथेरानमध्ये पहिल्यांदा पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांची गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. माथेरान या वाहनांना बंदी असलेल्या पर्यटन स्थळी पर्यटकांना वाहनतळावर उतरल्यानंतर पर्यटन स्थळाची माहिती देणारे पर्यटन माहिती केंद्र माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने सुरु केले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना माहिती देतानाच माथेरान विषयीची चित्रफीतदेखील दाखविली जाते आणि ध्वनिक्षेपक वरून माहिती देखील दिली जाते. दस्तुरी नाका येथे पर्यटनाकडून माथेरान मध्ये प्रवेश करण्यासाठी स्वच्छता कर संकलित करण्याचे केंद्र देखील याच ठिकाणी आहे. मात्र पर्यटकांना निसर्गरम्य माथेरान या पर्यटन स्थळाविषयी व इतर योग्य ती माहिती उपलब्ध करून दिली जाते. परंतु हे प्रवाशी माहिती केंद्र सध्या भंगाराच्या दोडम बनले आहे. त्या ठिकाणी पालिकेने आपले साहित्य ठेवले असून गेलिओ काही वर्षे त्या माहिती केंद्राचा वापर पालिका गोदाम म्हणूनच करीत आहे असा आरोप स्थानिक माहिती अधिकार कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी केला आहे.

सदर पर्यटक माहिती केंद्र माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने तात्काळ सुरु करावे अशी मागणी केली आहे. पुढील महिन्यापासून माथेरानचा पर्यटन हंगाम सुरु होत असून माथेरान पालिकेवर असलेल्या प्रशासक यांनी पर्यटक माहिती केंद्र सुरु करून पर्यटकांची माथेरान येथे आल्यानंतर गैरसोय तसेच फसवणूक होणार नाही यांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version