। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरातील वनट्री भागाकडे जाणार्या रस्त्याचे धूळविरहीत रस्त्यात रूपांतर करण्याचे काम गेली अडीच वर्षे रखडले आहे. मात्र, रस्ता तयार करण्यासाठी टाकण्यात आलेल्या खडीने अर्धा रस्त्याच व्यापून घेतला आहे. तर, रस्त्याच्या बाजूला क्ले पेव्हर ब्लॉकचे ढीग आहेत. त्यामुळे या लाल मातीच्या रस्त्यावर समोरून घोडे आल्यानंतर स्थानिक नागरिकांची ये-जा करताना तारांबळ उडत आहे. त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी माथेरान पालिकेला निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांची रखडलेली कामे करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा अहवाल मुंबई आयआयटीने केलेल्या सर्वेक्षण नंतर शासनाला दिला असल्याने त्या सर्व रखडलेल्या रस्त्यांची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पालिका प्रशासन ढिम्म असल्याने स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.