। पेण । प्रतिनिधी ।
गेली चार वर्षे महसुली सातबारा मिळावा म्हणून वन हक्क कायदयांतर्गत प्राप्त झालेल्या दावेदार आदिवासींनी जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार ते वन खात्यापर्यंत अनेक शिष्टमंडळे उपोषण मोर्चे काढण्यात आले होते. तरीदेखील यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त झालेल्या आदिवासींनी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी 25 मार्च रोजी पेण प्रांत कार्यालयावर कुटुंबियांसह आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.
या वैयक्तिक दावेदार आदिवासींना महसुली सातबारा मिळावा म्हणून आत्तापर्यंत साकव संस्थेने तीन जिल्हाधिकारी, दोन उपवनसंरक्षक, दोन प्रांत, चार तहसीलदार व तीन आरएफओ यांना निवेदने दिली आहेत. शिष्टमंडळ व दोन वेळा उपोषणे व मोर्चे नेण्यात आलेले आहेत. यापैकी एका मोर्चाला विद्यमान खासदार धैर्यशील पाटील हजर होते. परंतु, प्रत्येक वेळा त्यांच्या आश्वासनापलीकडे काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येथील आदिवासींमध्ये तीव्र नाराजी आहे. यासंदर्भात बरडावाडी येथे शनिवारी (दि.15) वन हक्क व दळी धारक आदिवासींचा साकव संस्थेचे पांडुरंग तुरे यांच्या अध्यक्षते खाली भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला पाबळ, वरप, जिर्णे व महालमीरा डोंगर या ग्रामपंचायत क्षेत्रातील 225 आदिवासी महिला पुरुष प्रतिनिधी हजर होते. या मेळाव्याला उमेश दोरे व खुमा दोरे यांनी मार्गदर्शन केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भूषण जनार्दन वाघमारे, लक्ष्मण केणी, सुधीर पोशा म्हात्रे यांनी मेहनत घेतली.