। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील खोपोली रस्त्यावर असलेल्या पळसदरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये कल्पतरू हे बांधकाम व्यवसायिक जमीन विकसित करण्याचे काम करीत आहेत. मात्र, जमिनीची खरेदी न करता कल्पतरू विकासकांकडून शेतकर्यांच्या जमिनीमध्ये घुसखोरी केली जात होती. घुसखोरी केल्यानंतर स्थानिक शेतकरी जाब विचारू लागल्यावर कल्पतरूकडून शेतकर्यांना धमक्या देण्यात येत होत्या. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी आक्रमक भुमिका घेत तब्बल 15 तास कर्जत पोलीस ठाण्याच्या पायरीवर बसून आंदोलन केले होते. दरम्यान, आता त्या सर्व जमिनीच्या मोजण्या भूमि अभिलेख यांच्याकडून करण्यात आल्यावर कल्पतरू प्रशासनाचा खोटारडेपणा समोर आला आहे. यातील चार पैकी तीन शेतकर्यांच्या जमिनींमध्ये कल्पतरूने घुसखोरी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पळसदरी ग्रामपंचायत मधील बहुसंख्य गावांमधील जमिनीमध्ये कल्पतरू बिल्डरकडून गृह प्रकल्प उभारले जात आहेत. गेली तीन-चार वर्षांपासून तेथे कल्पतरू कडून जमिनीची खरेदी केली जात आहे. सध्या त्या जमिनीचे अकृषिक मध्ये रूपांतर करून गुंठे स्वरूपात भूखंड निर्माण केले जात आहेत. त्या भूखंडाचे निश्चितीकरण करण्यासाठी कल्पतरूकडून सिमेंट खांब उभे केले जात होते. त्या भागातील नांगुर्ले, वर्णे भागातील अनेक शेतकर्यांनी कल्पतरू बिल्डरला जमिनी दिल्या नाहीत आणि असे असताना देखील कल्पतरूकडून जमीन अकृषीकी करून त्यावर सिमेंट खांब उभे करून जमिनी बळकावल्या जात असल्याच्या तक्रारी शेतीकरी करीत होते. यापूर्वी येथील शेतकर्यांनी उपोषणे देखील केली आहेत. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने कल्पतरू प्रशासन काही नमले नव्हते.