। महाड । प्रतिनिधी ।राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सात डिसेंबर रोजी किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रायगड किल्ला 7 डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रायगड-अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आलीय.
दरम्यान किल्ले रायगडबरोबरच रायगड रोप-वेही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाने म्हटलं आहे. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पर्यटकांची गौरसोय होवू नये, म्हणून या हेतूने दौर्याच्या दोन दिवस आधीच ही माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. राष्ट्रपती रायगडाला भेट देणार ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असे संभाजीराजे ट्विटरवरुन म्हणाले होते.