। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्याचे मुख्य प्रशासकीय भवन असणार्या तहसीलदार कार्यालयात मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी पाहणी केली असता या कार्यालयातील नायब तहसिलदार, लिपिक यांच्या सह अनेकांच्या खुर्च्या सकाळी 10.45 वाजता देखील रिकाम्या असल्याचे चित्र दिसून आले आहे. यापूर्वी देखील साडे दहा वाजले तरी शासकीय अधिकारी व कनिष्ठ कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात वारंवार दिसून येत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे नाराजी व्यक्त करून देखील यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. शासनाने कोरोना काळात राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कामकाजाच्या वेळेत पाऊण तास वाढ करत 29 फेब्रुवारी 2020 पासून सर्व शासकीय कार्यालये आठवड्यात केवळ पाच दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता किती वाढली हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण शासकीय कार्यालयात कामकाज करण्यासाठी नागरिकांना वारंवार फेर्या माराव्या लागत असल्याने सर्व शासकीय कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारावर कामकाजाच्या वेळांचे फलक लावण्यात यावेत अशी मागणी रोहा शेकाप चिटणीस राजेश सानप यांनी केली आहे. शासकीय कर्मचार्यांना पाच दिवसांचा कामकाज आठवडा या आनंदात कामकाजाच्या वेळेचा सार्वत्रिक विसर पडला असल्याने सर्व शासकीय कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारावर कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचा फलक लावणे बंधनकारक करावे अशी जाहीर मागणी रोहा तालुका शेकाप चिटणीस राजेश सानप यांनी केली आहे. या निर्णयातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस व अग्निशमन दल, शासकीय महाविद्यालये यांना मात्र वगळण्यात आले आहे.