खारघर परिसरातील धबधब्यांवर पर्यटकांना बंदी


। पनवेल । वार्ताहर ।
खारघर परिसरातील पांडव कड्यासह इतर छोट्या मोठ्या धबधब्यांवर पर्यटकांनी वर्षासहलीसाठी येऊ नये असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. या संदर्भात खारघर पोलीस ठाण्याकडून सर्व नागरिक व पर्यटक यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, खारघर मधील डोंगर भागात पावसाचे पाणी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे झरे निर्माण होऊन पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज, घामोळे गाव, तसेच आजूबाजूच्या परिसरात पावसाचे लहान-मोठे धबधबे चालू होतात. त्यामुळे डोंगरावरून वाहणार्‍या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या धबधबा तयार होतात तेव्हा सदर ठिकाणावर दर शनिवार, रविवार, इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटक या धबधब्याच्या धारेखाली बसण्यासाठी येथे जमा होतात.

सदर परिसरात जमा झालेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटक पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे यापूर्वी झालेले आहे. अशा घटना होऊ नये याकरता विशेष कार्यकारी दंडाधिकारी पनवेल विभाग, नवी मुंबई, यांचेकडून यांचेकडून फौजदारी प्रक्रिया सहिताचे कलम 144 प्रमाणे दिनांक 7 जून ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. तरी याद्वारे सर्व खारघर रहिवाशी व पर्यटक यांना सुचित करण्यात येते की सदर प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटन करताना कोणी व्यक्ती मिळून आल्यास त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्याकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी सांगितले आहे.

पर्यटकांमधून नाराजीचा सूर
खारघर परिसरात असणार्‍या पांडवकडा धबधब्याला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. त्यामुळे साहजिकच परिसरातील नागरिकांना याठिकाणी पर्यटनासाठी येण्याचा मोह आवरत नाही. परंतु आपल्या मनपसंत नैसर्गिक स्थळी जाण्यासाठी प्रशासनाने बंदी घातल्याने पर्यावरणप्रेमी तसेच पर्यटकांमधून नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version