पर्यटकांनी भरला 47 हजार रुपयांचा दंड

। पुणे । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद असल्याचे प्रशासनाने जाहीर करूनही खडकवासला धरण परिसरात पर्यटकांच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी नाकाबंदी केल्याने प्रत्येक पर्यटकावर कारवाई करण्यात आली. दिवसभरात 47 हजार 500 रुपये दंड जमा झाला.प्रशासनाने लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर गेल्या शनिवार-रविवारी पर्यटकांनी खडकवासला,सिंहगड, पानशेत, लोणावळा,ताम्हिणी, मुळशी भागात गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणासाठी अखेर गावकर्‍यांनी पोलिसांना पाचारण केले होते. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाउनचे निर्बंध उठवलेले नाहीत.

पर्यटकांची गर्दी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी वीकेंड पर्यटनास बंदी जाहीर केली; तरीही अतिउत्साही पर्यटकांनी सकाळपासूनच खडकवासला धरण परिसरात गर्दी करायला सुरुवात केली होती. त्यामुळे पोलिसांनी धरणाच्या सुरुवातीलाच नाकाबंदी लावली. आलेल्या प्रत्येक पर्यटकाकडून 500 रुपये दंड आकारण्यात आला. पावती देऊन त्यांना परत पाठविण्यात आले. दुपारी पर्यटकांची गर्दी वाढल्याने दोन किलोमीटर अंतरापर्यंत चारचाकी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. नियम तोडल्यामुळे त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.खडकवासला धरण, डोणजे, गोळेवाडी भागात आम्ही सकाळपासून नाकाबंदी केली होती. पर्यटनास आलेली 132 वाहने आणि व्यक्तीवर कारवाई केली. यातून 47 हजार 600 रुपये दंड जमा झाला.

Exit mobile version