चोंढी रेल्वे फाटकावर वाहतूक कोंडी

| सोगाव | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या अलिबाग- रेवस मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. या मार्गावर चोंढी येथे रेल्वे फाटकावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्यामुळे सर्वजण मेटाकुटीला आले आहेत. याबाबत संबंधित अधिकारी वर्गावर वाहनचालक, नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अलिबाग- रेवस मार्गावरील थळ, चोंढी, किहीम, झिराड, आवास, सासवणे, मांडवा, म्हात्रोळी, रेवस भागात मोठ्या प्रमाणात राजकीय, सामाजिक, सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योजक आदींचे फार्महाऊस, आहेत. त्या बांधकामासाठी लागणाऱ्या, खडी, रेती, डबर, माती, सिमेंट, लोखंडी सळ्या, पाण्याचे टँकर आदी लागणाऱ्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे यामार्गावर चोंढी नाक्यावर वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, याबाबत संबंधित अधिकारी, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. तरी याबद्दल प्रशासन कधी जागे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version