अलिबाग-रोहा मार्गावर वाहतूक कोंडीचे संकट

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग-रोहा मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका रोहा, मुरूड, अलिबागकडे जाणार्‍या प्रवाशांना व पर्यटकांना बसत आहे. विशेष म्हणजे अलिबाग ते बेलकडे या तीन किलो मीटरच्या अंतरावर वाहनांच्या रांगाच रांगा निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न वाहतूक पोलिसांनी सोडवावा, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. अलिबागबरोबरच रोहा, मुरूडकडे जाणार्‍यांची संख्यादेखील प्रचंड आहे. शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून अलिबाग-रोहा मार्गावर वाहतूक कोंडीचे संकट उभे राहिले आहे. संध्याकाळी व सकाळच्या दरम्यान अवजड वाहनांची वर्दळही प्रचंड आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. गेल्या महिन्याभरापासून हा प्रश्‍न गंभीर होऊ लागला आहे. याकडे स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version