। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत शहरातील रिक्षा स्टँड खुले करुनही शहरातील वाहतुक कोंडी कायम, वाहतुक कोंडी करणार्या सर्व वाहनांवर कारवाई होणार का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांनी उपस्थित केला आहे.अधिकृत रिक्षास्टँड न मिळाल्याने काही दिवसांपुर्वी फिरत्या रिक्षाधारकांनी अधिकृत रिक्षास्टँडमध्ये सामावून घेण्यासाठी उपोषणे, आंदोलने आणि खुप मोठा संघर्ष केला. त्यामुळे संबंधित विभागातील शासकीय अधिकारी तसेच राजकीय पुढारी नेते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मध्यस्थीने सर्व फिरस्त्या रिक्षाधारकांना शहरातील सर्व अधिकृत रिक्षास्टँडमध्ये सामावून घेऊन विरोधातील वाद देखील मिटवला गेला.
परंतू, आजही अनेक रिक्षाचालक शहरातील रस्त्यांवर कुठेही, वाकड्या तिकड्या रिक्षा लावून वाहतुक कोंडी करत आहेत. शिवाय पादचार्यांना देखील रस्त्यावर चालताना अडथळा करत आहेत. सर्वच रिक्षाधारकांना मुख्य बाजारपेठेतून व रेल्वे स्थानक परिसरातूनच रिक्षा व्यवसाय करायचा आहे असे दिसत आहे. शहरातील बहुतांशी अधिकृत रिक्षास्टँड रिक्षांविना ओस पडले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना, महिलांना, वयोवृद्धांना, आजारी रुग्णांना आपल्या परिसरातुन इच्छित स्थळी जाण्यास रिक्षा मिळत नसल्याने त्यांची खुपच परवड होत आहे. तरी, संबंधित प्रशासकीय अधिकार्यांनी ह्याची दखल घेऊन वाहतुककोंडी करणार्या रिक्षाधारकांसह इतर वाहनांवर देखील कायदेशीर कारवाई करावी. तसेच रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त शहरातील इतर रिक्षा तळांवरुन देखील रिक्षाधारकांना व्यवसाय करण्यास सुचना कराव्यात. जेणेकरून शहरातील सर्व सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय दुर होईल असे मत गंगावणे यांनी व्यक्त केले.
कर्जत शहरातील वाहतुक कोंडी कायम
