रोह्यातील वाहतुकीची कोंडी फुटणार

महापुरात जमीनदोस्त झालेल्या नाल्याचे काम युद्धपातळीवर सुरू

| रोहा | प्रतिनिधी |

यंदाच्या जून महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात रोहा-धाटाव मार्गावरील दमखाडी नाक्यावरील जयराम मार्केटसमोरील मुख्य नाला खचल्याची दुर्दैवी घटना घडली होती. नाल्याचे काम प्रलंबित असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असे. सध्या या नाल्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, रस्त्याचे काम पूर्ण होताच रोहा-धाटाव मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

दमखाडी येथील जयराम मार्केट या व्यापारी आणि रहिवासी संकुलासमोरील मुख्य नाला मुसळधार पावसात जमीनदोस्त झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर सदर नाल्याचे काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने दुकान मालक, ग्राहक व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असे. जमीनदोस्त नाल्यामुळे घटनास्थळी वाहतुकीची कोंडी होत असे. सदरचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी जनतेतून होत असे. दरम्यान, नाल्याच्या कामामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर होऊन वाहतुकीची कोंडी सुटणार असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version