अवैध पार्किंगमुळे होतेय वाहतूककोंडी
| सुकेळी | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावरील तसेच वाकण-पाली-खोपोली मार्गाकडे येण्या-जाण्यासाठी महत्त्वाचा नाका म्हणून वाकण नाक्याची ओळख आहे. याच नाक्यावर अनेक हॉटेल्स आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन तसेच वाकण-पाली-खोपोलीकडे येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या चहा, नाश्ता करण्यासाठी नाक्यावरील हॉटेलच्या समोर बिनधास्तपणे उभ्या करतात. परिणामी, त्याचा त्रास स्थानिक वाहनचालकांसह पादचाऱ्यांना बसत आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.
वाकण नाका सद्यःस्थितीत वाहतुकीच्या दृष्टीने गजबजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या मार्गावरील वाहनांची संख्या पाहता वाकण नाका हा वाहतुकीच्या दृष्टीने पार्किंगसाठी अपुरा ठरत आहे. त्याच्यातच या नाक्यावरुन मोठ्या प्रमाणात प्रमाणापेक्षा भरलेल्या डंपरमधून कोळशाचीदेखील वाहतूक होत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला हॉटेल असल्यामुळे या ठिकाणी थांबवणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक वेळा अपघातसुद्धा घडत आहेत. अनेकदा वाहनचालकामध्ये वाद झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. वाकण नाक्यावर पोलीस चौकी असूनसुद्धा वाहनांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाययोजना आखणार की नाही, असा सवाल स्थानिक वाहनचालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
