मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

| कोलाड | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरुन मुंबई, ठाणे, तसेच पुणे येथून उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक तसेच कोकणवाशी कोकणात निघाले आहेत. परंतु, खांब कोलाडपासून इंदापूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून गेली नऊ दिवसापासून हिच परिस्थिती दिसून येत आहे.

खांब व कोलाड परिसरात महामार्गाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एसटी बस, खासगी चारचाकी, रिक्षा, दुचाकी व इतर वाहनांमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे ही कोंडी नेमकी केव्हा सुटणार, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
‘रोज मरे त्याला कोण रडे’, अशी अवस्था दिसून येत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भर उन्हात उभे राहून रायगड पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

1 मे पासून उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. गर्मीने हैराण झालेले नागरिक शरीराला गारवा मिळण्यासाठी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील समुद्रावर जाण्यासाठी मुंबई, ठाणे पुणे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातुन असंख्य पर्यटक तसेच कोकणवाशी महामार्गावरुन एसटी, फोर व्हिलर, रिक्षा, टू व्हीलर, तसेच इतर वाहनांनी कोकणात निघाले आहेत. परंतु महामार्गावरील अपूर्ण कामामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन वाहतूक कोंडी निर्माण झाली.

महामार्गाचे काम गेली अठरा वर्षांपासून सुरु आहे.परंतु हे काम काही केल्या पूर्ण होईना लोकनेत्याकडून फक्त तारीख पे तारीख, दिल्या जात आहेत. आता नवीन डेडलाईन मे अखेर दिली आहे. पण हे काम पूर्ण होईल असे कामाच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे,जणु डेडलाईनची पद्धत लांडगा आला रे आला, अशी झाली आहे. कारण लोकांना गणपती, होळी व उन्हाळी सुट्टीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतुक कोंडीतून सुटका केव्हा होणार? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version