अलिबाग वडखळ मार्गावर वाहतुक कोंडी

| सोगाव | वार्ताहर |

सलग सुट्टीनिमित्ताने अलिबाग मुरुडकडे रस्ते मार्गाने आलेल्या पर्यटकांनी सोमवारी मात्र परतीच्या प्रवासाला निघताना मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे व बेशिस्त वाहनचालकांमुळे अलिबाग वडखळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अलिबाग वडखळ मार्गावर कार्लेखिंड, तिनवीरा ते पेझारी, पोयनाड ते शहाबाज दरम्यान दिवसभर येणाऱ्या व जाणाऱ्या पर्यटकांच्या बेशिस्त वाहनचालकांनी वाहतुकीस अडथळा निर्माण केला, त्यामुळे स्थानिक वाहनचालक व पर्यटकांच्या बेशिस्त वाहनचालकांमध्ये जागोजागी वाद निर्माण झाला होता. यामुळे वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात होत होती, मात्र यामध्ये वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीवर दुर्लक्ष करीत फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. कार्लेखिंड पासून धरमतर दरम्यान एकही वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपस्थित नव्हता, यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक या वाहतूक कोंडीचा फटका बसत असल्यामुळे याबाबत अनेक वाहनचालकांनी व प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वाहतूक पोलिसांबाबत नाराजी व्यक्त करत पोलिसांनी अशा हुल्लडबाज व बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Exit mobile version