अपघाताच्या प्रमाणात वाढ; रुग्णांचे हाल
| मुरुड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अलिबाग-मुरूड या मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहने समोरासमोर आली की दीड तासाचा प्रवास चार चार तासांवर पोहोचत आहे. त्यातच ठिकठिकाणी खड्डे खोदल्याने अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. अशातच रुग्णवाहिकेलाही अलिबागमधील शासकीय रूग्णालयात पोहोचायला विलंब होत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याची मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे.
रेवस-रेड्डी महामार्गावरील अलिबाग-मुरूड या रस्त्याचे काम जोरदार सुरू आहे. या कामामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था न केल्याने वाहन चालकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, अतिदक्ष अशा रुग्णांना वाहतूक करताना रुग्णवाहिका या मार्गावर चार चार तास अडकून पडत आहेत. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गावर खोदलेल्या रस्त्यांमुळे दुचाकी स्वारांना अपघात होत आहेत तसेच रुग्णवाहिकेचे टायर सुद्धा फुटत आहेत. या मार्गावर होणाऱ्या वाहन चालकांच्या मनस्तापासाठी साळाव-मुरुड व साळाव-सुपेगाव या मार्गाचा एकेरी वाहतूकी साठी वापर करण्यात यावा, जेणेकरून साळाव, काशीद व मुरुड या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी रोखता येईल, अशी मागणी सर्व वाहन चालक स्थानिक ग्रामस्थ नागरिक यांच्यावतीने जोर धरीत आहे.
