नगरपरिषदेकडून पर्यायी व्यवस्था नाही
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड भाजी मार्केट बाहेर गावठी भाज्या विक्रेत्या महिलांची वाढती संख्या डोकेदुखी ठरणार असे दिसून येत असून एकमेकांना भाजी विक्रीसाठी जागा न मिळाल्यास प्रकरण हमरीतुमरीवर येण्याचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे ग्राहकांची कोंडी होत आहे, त्यामुळे येथे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपरिषदेने बाहेर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून ही समस्या सोडवावी, अशी मागणी मुरूड भाजी मार्केटमधील विक्रेते सुधीर मेस्त्री, श्रीकांत कोळवणकर, सुभाष कासेकर, उमेश पाटील, आणि अन्य काहींनी केली आहे.
मार्केट बाहेर भाजी विक्री करणाऱ्या कडून नगरपरिषद शुल्क म्हणून पावती फाडत असतात. तसेच मुरूड मिनिडोर रिक्षा थांबा असणाऱ्या कारेकर गल्लीत गावठी भाज्या विक्रीसाठी दररोज महिला भगिनी बसत असतात. त्यावेळी भाजी घेण्यासाठी अनेकजण येथे गर्दी करतात. भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारापर्यंत वर्दळ असते, अशातच मिनिडोर रिक्षांची ये-जा सुरू असते. त्यामुळे भाजी विक्रेत्या आणि रिक्षा थांबा यातील रस्ता अरुंद होत जातो. अशावेळी रिक्षाचा धक्का लागून अपघाताची दुर्घटना देखील घडू शकते. नगरपरिषदेने अशा भाजी विक्रेत्यांना मार्केटच्या पहिल्या मजल्यावर किंवा अन्य ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून वाहतूक कोंडी दूर करावी. याबाबत नगर परिषद, पोलीस यंत्रणेला निवेदन दिलेले आहे. परंतू उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे वादाची ठिणगी पडू शकते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे
मुरूड भाजी मार्केट बाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांच्या जागा समस्येबाबत आधिक माहिती घेऊन उपाययोजना करू तसेच ही समस्या लवकरच मार्गी लावली जाईल.
पंकज भुसे, मुख्याधिकारी