मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली

| खोपोली | प्रतिनिधी |

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत मंगळवारी (दि.23) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबईच्या मार्गावर 24.250 व पुणे मार्गावर 56.900 किलोमीटर (कुसगाव वाडी) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. दुपारी 12 ते दोन दरम्यान वाहतूक वळविण्यात आली होती. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किलोमीटर 55 वरून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना पुणे-मुंबई महामार्गावरून मार्गस्थ करण्यात आले. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बस खोपोली एक्झिट किलोमीटर 39.800 येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबईच्या मार्गावर सोडण्यात आली होती.

पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी व जड-अवजड वाहने ही खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट किलोमीटर 32.500 येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबईच्या रस्त्यावर मार्गस्थ करण्यात आली होती. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व वाहने किलोमीटर 54.900 येथील कुसगाव टोल नाका येथून वळवून जुना पुणे-मुंबई महामार्गावरून पुणे बाजूकडे वळविण्यात आली होती.

Exit mobile version