बेशिस्त चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका

कारवाईतून एक लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या चालकांना जिल्हा वाहतूक शाखने दणका दिला आहे. सोमवारी (दि. 5) रोजी दिवसभरात 275 जणांविरोधात कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

रायगड जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबर पर्यटनामुळे वाहनांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात दुचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढू लागली आहे. मात्र काही वाहन चालक वाहतूकीच्या नियम मोडीत वाहन चालवित आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती अधिक आहे. वाढत्या अपघाताला रोखण्याबरोबरच बेशिस्त चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य, जिल्हा महामार्गाबरोबरच नाक्यानाक्यावर वाहतूक पोलीस तैनात केले आहे. सोमवारी दिवसभरात रस्त्यावरून धावणार्‍या वाहनांकडे पोलीस लक्ष ठेवून होते. त्यामध्ये वाहन वेगात चालविणे, विना हेल्मेट असणे, टीबलशीट असणे, ज्यादा प्रवासी वाहतूक करणे अशा अनेक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या चालकांवर पोलीसांनी कारवाई केली.

Exit mobile version