कर्जत चार फाटा येथे वाहन तपासणी; 11 जणांवर दंडात्मक कारवाई
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. कर्जत चार फाटा येथे करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान हेल्मेट न वापरणाऱ्या 11 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच वाहनचालकांना हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
कर्जत तालुक्यात अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण वाढले असून, यामध्ये दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. अनेक अपघातांमध्ये दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर न केल्याने गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
कर्जत चार फाटा येथे वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांना थांबवून हेल्मेट तसेच वाहन परवान्याची तपासणी केली. हेल्मेट न वापरणाऱ्या 11 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी प्रत्येक दुचाकीस्वाराला वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी सुरक्षित वाहनचालना करण्याचे आवाहन केले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक राजेश रामदास यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचारी बी. डी. तिडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सताने, होमगार्ड महेश रुठे, सुधीर धुळे, अनिल गवळे आदी उपस्थित होते.
