| पनवेल | वार्ताहर |
ट्रेलरने मोटरसायकलला धडक दिल्याने शिवराम म्हात्रे (50) यांच्या अंगावरून ट्रेलरचे चाक गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवराम म्हात्रे हे पत्नी संध्या म्हात्रे रा. खालापूर यांच्यासह मोटरसायकल वरून एक कार्यक्रम उरकून रात्री नऊच्या सुमारास हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलवरून परत जात असताना नाईट रायडर बारच्या समोर कोन गाव येथे आले होते. यावेळी ट्रेलर चालकाने ट्रेलर भरधाव वेगाने चालवला आणि मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत संध्या म्हात्रे या रस्त्याच्या कडेला पडून जखमी झाल्या तर शिवराम म्हात्रे यांच्या अंगावरून ट्रेलरचे चाक गेले आणि त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.