| पनवेल | वार्ताहर |
लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षांपूर्वी पळवून नेलेल्या तरुणीशी लग्न न करता तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या तरुणाने तिला सोडून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरोधात अपहरणासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील 23 वर्षीय पीडित तरुणी तळोजा येथे राहण्यास असून, तिच्यासोबत राहणारा 28 वर्षीय किरण हा तरुण बीड जिह्यातील आहे. चार वर्षांपूर्वी किरण तळोजा भागात राहण्यासाठी आला असताना, पीडित तरुणी व किरण या दोघांमध्ये प्रेमसंबध निर्माण झाले होते. त्यावेळी आरोपी किरणने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला तळोजा गावातून पळवून नेले होते. त्यानंतर हे दोघेही लग्न न करता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना दोन वर्षांपूर्वी एक मुलगीही झाली. त्यानंतर हे दोघेही तळोजामध्ये राहत असताना किरणने काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीला व दोन वर्षीय मुलीला इथेच सोडून आपल्या मूळ गावी पलायन केले. या प्रकारानंतर पीडित तरुणीने किरणच्या बीड येथील मूळ गावी धाव घेतली. मात्र, त्याच्या कुटुंबियांनी तिला स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाले. पीडित तरुणीला यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बीड पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवून घेत तिचा स्वीकार न करणार्या आरोपी किरणविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला.