| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गाव व देवकान्हे गावातील महिलांनी स्वतःचा व्यवसाय करून त्यांनी स्वयंरोजगार करावा यासाठी शिलाई मशीन व्यवसायाचे प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच यशस्वीपणे पार पडला.
रेस्टी स्टार स्वयंरोजगार संस्था अलिबाग यांच्या वतीने व बँक ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे रोशन पाटील व अनिता मोरे यांनी या प्रशिक्षण शिबिरात महिलांना सर्वोत्तम मार्गदर्शन केले. सलग वीस दिवसांहून अधिक दिवस चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात बाहे व देवकान्हे गावातील विविध बचत गटांतील सुमारे 90 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
या शिबिरात कापडापासून उशी कव्हर, पेन पाऊच, हात पिशवी, हातरूमाल आदींसह अन्य कापडकाम शिकविले. रेस्टी स्टार स्वयंरोजगार संस्था अलिबाग यांच्या वतीने व बँक ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिराचा आम्हा महिलांना चांगला फायदा झाला असून, या प्रशिक्षणाची माहिती व ज्ञानाचा उपयोग आमच्या बचत गटांसाठी व वैयक्तिक पातळीवर करून स्वयंरोजगार निर्माण करणार असल्याची माहिती येथील महिला प्रतिनिधी स्वाती ठाकूर व मीनाक्षी थिटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.






