डॉ. अपूर्व भट यांची यशस्वी शस्त्रक्रिया
| रोहा | प्रतिनिधी |
एका वृद्ध महिलेच्या पोटातून चार किलो वजनाची गाठ काढून तिच्यावर डॉ. अपूर्व भट यांना यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात यश आले आहे. एक 75 वर्षांच्या वृद्ध महिलेचा पोटाचा आकार काही दिवसांपासून वाढत होता. त्यामुळे ती खूप हैराण झाली होती. तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी तिला घेऊन रोह्यातील डॉ.अपूर्व भट यांचे हॉस्पिटलमध्ये आणले व सर्व हकीकत डॉक्टरांच्या समोर मांडली. डॉ. अपूर्व भट यांनी वृद्ध महिलेच्या काही तपासण्या केल्यावर त्यांचा लक्षात आले की, पोटात खूप मोठी गाठ आहे. त्यानंतर त्या वृद्ध महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरल्यावर शस्त्रक्रियाची पूर्वतयारी करून सुनियोजित पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. यादरम्यान पोटातील ही गाठ गर्भ पिशवीमध्ये तयार झाली होती. ही गाठ पोटात मोठे आतडे, मूत्रनलिका अशा अतिमहत्त्वाच्या अवयवांना चिकटलेली होती. चार तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर या नाजूक व महत्त्वाच्या अवयवांपासून ही गाठ सोडवून यशस्वीपणे बाहेर काढली. फारसा रक्तस्त्राव न झाल्याने वृद्ध महिला रुग्णाची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर लवकर सुधारली व तिसऱ्या दिवशी रुग्णालातून घरी सोडण्यात आले.





